२० हजारांची लाच स्वीकारताना वनपालासह दोन वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात; गोंदियातील कारवाई


गोंदिया | ११ ऑगस्ट २०२६: रेतीचा उपसा आणि वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन विभागातील वनपालासह दोन वनरक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. गोंदिया जिल्ह्यातील पारसटोला परिसरातील राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत वनपाल रमेश सखारामजी पचारे (वय ५७), वनरक्षक निलोत्पल हिरालाल शिकारे (वय ३१) आणि वनरक्षक चिंटू मंगलसिंग परिहार (वय ३८) यांना ताब्यात घेण्यात आले.
२५ हजारांची मागणी, २० हजारांवर तडजोड
एसीबीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. मार्च २०२६ मध्ये घरासाठी आवश्यक रेती गावालगतच्या नाल्यातून आणली जात असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवला होता.
रेती उपसा आणि वाहतुकीबाबत कारवाई करण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पुन्हा अडवून त्याची चावी काढून घेण्यात आली. गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराला ८ ऑगस्ट रोजी पारसटोला राऊंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तडजोडीची चर्चा करून २५ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले.
एसीबीकडे तक्रार; मागणीची पडताळणी
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
पडताळणीदरम्यान व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाची नोंद करण्यात आली. यामध्ये रेती उपसा आणि वाहतुकीबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.
लाच स्वीकारताच एसीबीचा सापळा
लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराला पंचांसह लाचेची रक्कम घेऊन संबंधित कार्यालयात पाठविण्यात आले.
यावेळी वनपाल रमेश पचारे यांनी २० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. घटनास्थळी वनरक्षक निलोत्पल शिकारे आणि वनरक्षक चिंटू परिहार हे देखील उपस्थित असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
तिन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध किशोरी पोलीस ठाणे, जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्यासह एएसआय करपे, हेड कॉन्स्टेबल बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले आणि डांगे आदी अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले.
लाच मागितल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
टीप: वरील प्रकरणातील आरोप हे तपासाच्या आधारे नोंदवलेले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित आरोपींना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.




