नव्या हरितक्रांतीची चाहूल

राज्य आज तंत्रज्ञानात आघाडीवर असलं तरी आजही राज्यात शेतकरी आणि त्याचा शेती व्यवसाय हा महाराट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना समृद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांची कर्जातून कायमस्वरुपी मुक्तता व्हावी या उद्देशाने राज्यात सन 2022 या वर्षांपर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातून सध्या प्राप्त होत असलेल्या उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे.
शेतीसाठी कर्ज घ्यायचे आणि प्रतिकूल स्थितीत शेतीत नुकसान झाल्यास पुन्हा नव्याने कर्जमाफीची मागणी व पुन्हा कर्ज या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका करणारी ही नवी हरितक्रांती या निमित्तानं राज्यात होवू घातली आहे.
या मोहिमेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी जिल्हा हा घटक न मानता तालुका हा घटक मान्य करण्यात आला आहे. पिकांच्या वाढीत त्याची गुणवत्ता तसेच त्यात असणारी जैवविविधता यांच्या जोडीला पेरणी कालावधी, पेरणीसाठी योग्य बियाणे, मातीचा कस यांचा अभ्यास करुन एका बाजूला उत्पादनाचा खर्च घटविण्यात येणार असून उत्पन्नाची सांगड बाजारपेठेतील चढउतारांचा विचार करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळेल यासाठी प्रयत्न करुन शेती विक्रीचे तंत्रज्ञान शिकवत नफा कसा कमावता येईल, याचेही प्रशिक्षण यात सामील आहे.
केवळ शेतीवर अवलंबून न राहता पुरक व्यवसायांची जोड देण्याचाही प्रयत्न यात करण्यात येणार आहे. या ‘ उन्नत शेती-समृध्द शेतकरी ‘ मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने शेतकरी संघटन व शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादक कंपन्यांद्वारे व्यावसायिक क्षमता बांधणी, काढणी तसेच शेतीमाल हाताळणी व मूल्यवर्धन या बाबीवर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक उत्पादन कसे घ्यावे याची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासोबतच प्रमुख पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्याची हाताळणी आणि अन्य पायाभूत बाबींचे प्रशिक्षण या अंतर्गत अपेक्षित आहे. विविध शासकीय योजनांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात देण्याची सुरुवात झालेली आहे. या योजना लाभाच्या अंमलबवणीत मोठया प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत या मोहिमेत मोठे कामकाज होणार आहे.
अनुवांशिकता व उत्पादन
सध्या शेतकरी ज्या प्रमुख पिकांचे उत्पादन आपला राज्यात करतात त्यात काही जणांनी अल्प अशी तंत्रज्ञान आणि उपकरणे यांची जोड दिलेली दिसत असली तरी बहुतांश शेती आजही पारंपरिक पद्धतीने होते. प्रत्यक्ष बियाणांची अनुवांशिक उत्पादकता आणि सिंचन यांची योग्य सांगड घातली गेल्यास केवळ उत्पादन खर्च आणि पीक कर्ज यांचा मेळ बसणार आहे असे नव्हे तर अनुवांशिक क्षमतेइतके उत्पादन घेतले गेल्यास शेतकरी कर्ज मुक्त होणार व त्याला त्याहीपेक्षा आधिक उत्पादन सातत्याने मिळणार आहे. या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी हंगामाची सुरुवात या खरीप हंगामापासूनच करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुकानिहाय आराखडे बनविण्याचे काम सुरु झाले आहे. विविध पिकांची उत्पादकता वाढविण्याचा पहिला टप्पा हा पिकांच्या प्रात्यक्षिकांचा राहणार आहे. प्रमुख पिकांची लागवड करताना त्यातून मिळणारे उत्पादन हे पीक कर्जापेक्षा अधिक असावे व कर्जाची परतफेड करुन शेतकऱ्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे हे प्राथम्याने ठरविलेले आहे.
गट शेतीस प्राधान्य
स्वतंत्रपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी 10 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी गट बनवून शेती केल्यास त्यांना वित्तसहाय्यात प्राधान्यक्रम मिळावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. याला देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गट पध्दतीने शेती करण्यात मोठया प्रमाणावर आर्थिक बचतीसोबत मनुष्यबळाची बचत होणार आहे. यासाठी निवडण्यात येणाऱ्या गटासाठी 10 शेतकऱ्यांचा गट असावा आणि किमान प्रत्येकी एक एकर जमिनीच्या अनुषंगाने आर्थिक सवलती आणि लाभ देण्याचे यात प्रस्तावित करण्यात आले आहे.उन्नत शेती- समृद्ध शेतकरी मोहिमेची ही अल्पशी ओळख आहे. याबाबत सविस्तर विवेचनासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधायचा आहे. (पूर्वार्ध)
लेखक – प्रशांत अनंत दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.
स्त्रोत – महान्युज